कुठल्याही प्रकारचे रसग्रहण करतांना तीन आयाम लक्षात घ्यावे लागतात.
तसेच, वाचन करतांना त्या तिन्हींचा विचार केला, तर कुठल्याही प्रकारचे वाचन अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल. इथे खाली दिलेला त्रिकोण समभुज आहे असे समजावे, कारण कुठलीही बाजू हि दुसऱ्या दोन्ही बाजूंपेक्षा महत्वाची किंवा जास्त मोठी नसते. इथे "लेखन" म्हणजे केवळ शाब्दिक/पुस्तकं असा अर्थ अभिप्रेत नसून "कलाकृती"असा घेतला तरी चालेल.
पैकी लेखकाचं आपल्या लेखनाशी असलेलं नातं अतिशय किचकट आहे. लेखकांचे बालपण, जडण-घडण, स्थळ-काळ वेळाचा प्रभाव, त्यांच्या लेखनावर होत असतो, ते दाखवणारी ही बाजू आहे. कधीकधी "लेखन झालं" अशा भाषेत लेखक आपल्या लिहिण्याच्या अनुभवाबद्दल सांगतात. म्हणजेच, लिहितांना त्यांनाही बरेचदा स्वत:च्या मानसिक प्रक्रियांबद्दल संपूर्ण ज्ञान नसतं , किंबहुना, त्यांच्या जिवनपटाचा अभ्यास करणारे लोकच त्याबद्दल ठोकताळे बांधत असतात. ही बाजू कळली, तर लेखकाने अमुक एक पात्र स्वत:वर आधारित केले आहे, किंवा, कादंबरीतील घटना अमुक एका शहरात घडतात कारण लेखकाने तिथे आपले बालपण व्यतीत केले....अशा प्रकारचे निष्कर्ष आपण काढू शकतो.
ह्या प्रकारच्या अभ्यासाला/रसग्रहणाला अर्थातच मर्यादा आहेत. कारण प्रत्येकच अभिव्यक्तीचा अशा पद्धतीने अर्थ लावता येत नसतो. पण, सुरुवातीला कुठलीही कलाकृती समजून घेण्यासाठी हे लेखक-लेखनाचं नातं समजून घेणं फार आवश्यक असतं.
पूर्वीच्या काळी रसग्रहण केवळ "चरित्र्यात्मक" असे, आणि त्यामुळे फारच मर्यादित असे. ह्या समीकरणात वाचक किंवा श्रोत्याची भूमिका लक्षात घेतली तर ते अजून समृद्ध आणि परिपूर्ण होईल, हे १९व्या शतकात लोकांच्या ध्यानी आलं. किंबहुना, एकदा लेखकाने लिहून पूर्ण केलं, कि कलाकृतिच्या अर्थ-शक्यतांवर तिच्या जन्मदात्याचा/जन्मदात्रीचा फारसा अधिकार उरत नाही.
महत्वाचं नातं, कदाचित वाचकचं त्या लेखनाशी असतं कारण शेवटी कुठलीही कादंबरी/कविता, कलाकृती ही वाचकाच्या मनातच जिवंत होत असते. वाचतांना स्वत:च्या अनुभवांच्या जवळ जाणारं लेखन आपल्याला जास्त आवडतं. इतकंच नव्हे, तर वाचक जितका प्रगल्भ असेल, तितके अर्थ त्याला/तिला एखाद्या लेखनात दिसतात, जाणवतात, कारण, प्रगल्भ वाचकाचा व्यक्तिगत संदर्भकोश तितका मोठा असतो. उदा. पु.ल. देशपांडे यांची व्यक्ती आणि वल्ली वाचतांना ज्यांना नाथा कामताच्या वाक्यांचे संदर्भ आधीच्या वाचनातून माहिती असतील, त्यांना नक्कीच त्यातून अधिक अर्थबोध होईल. इतकेच नव्हे, तर, "पैसा पैशाला ओढतो" म्हणतात, तसेच, पहिल्या वाचनाने, पुढील वाचन अधिकाधिक सोपे होत जाते, कारण मेंदू मध्ये नवीन वाचनाच्या पेशी जुन्या वाचाननुभवाशी जोडल्या जातात, असे विज्ञानाने सिद्ध केले आहे.
वाचकाचं लेखकाशी नातं, कधी खरं असतं, तर कधी केवळ शाब्दिक पातळीवर. एखाद्या लेखकाची शैली आवडते, मग तिची सगळी पुस्तके मिळवून वाचण्याची धडपड वगैरे गोष्टी ह्या नात्याला दृढ करत जातात. तसेच कधी लेखकाने/कवीने प्रत्यक्ष केलेले काव्यवाचन हे श्रोत्यांना अधिक आनंद देऊन जातं.
No comments:
Post a Comment